ज्ञानपीठ पुरस्कार आणि विजेते मराठी साहित्यिक

ज्ञानपीठ हा भारतीय साहित्यक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. आजच्या या लेखात आपण ज्ञानपीठ पुरस्कारांसंदर्भात माहिती करून घेणार आहोत.

ज्ञानपीठ पुरस्कार आणि विजेते मराठी साहित्यिक

ज्ञानपीठ पुरस्कार आणि विजेते मराठी साहित्यिक | Dnyanpeeth puraskar information in marathi

ज्ञानपीठ:

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यकृतीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जातो. हा पुरस्कार साहित्यीकाने भारतीय साहित्यवृद्धीसाठी दिलेल्या एकूण योगदानाचा व त्याच्या विशेष साहित्यकृतीचा गौरव करण्यासाठी दिला जातो.

पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा १९६५ साली मल्याळम भाषेतील साहित्यिकाला देण्यात आला होता.

आत्तापर्यंत मराठी भाषेतील ४ साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मराठी भाषेसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार १९७४ साली वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीसाठी मिळाला होता तसेच यानंतर १९८७ मध्ये वि. वा. शिरवाडकर, २००३ मध्ये विंदा करंदीकर व २०१४ मध्ये भालचंद्र नेमाडे यांना मिळाला.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक:

मराठी भाषेसाठी मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारासंदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे:-

१) वि. स. खांडेकर (१९७४):

सन १९७४ मध्ये विष्णू सखाराम खांडेकर यांना त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मराठी भाषेला लाभलेला हा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार होता.
खांडेकर यांची ययाती ही कादंबरी कुरू वंशातील राजा ययाती याच्या जीवनावर आधारित आहे. या कादंबरीतून खांडेकरांनी मानवी जीवनातील विविध पैलूंवर भाष्य केले आहे.

ही कादंबरी पौराणिक काळावर आधारित आहे पण काळ बदलला व कितीही पिढ्या सरल्या तरीही माणसाची भोगवादी प्रवृत्ती तशीच राहते हे या कादंबरीतून आपणास दिसून येते. वासनांच्या अधीन झालेला राजा ययाती, अहंकारी देवयानी, संन्यासाच्या अतिरेकात बुडालेला यती अशी अनेक पात्रे रंगवताना लेखकाच्या प्रतिभाशक्तीचा कस लागला आहे.

२) वि. वा. शिरवाडकर (१९८७):

मराठी भाषेसाठी दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार हा कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी मिळाला. कुसुमाग्रजांचा विशाखा हा ५७ कवितांचा काव्यसंग्रह १९४१ मध्ये प्रकाशित झाला होता.

कवी कुसुमाग्रज हे प्रतिभावंत कवी तसेच उत्कृष्ट कादंबरीकार व कथाकार होते. त्यांच्या एकूण साहित्यकृतीमध्ये अनेक काव्यसंग्रह, नाटक, निबंध, कथासंग्रह, एकांकिका यांचा समावेश आहे. त्यांच्या प्रत्येक लिखाणातून त्यांच्यातील गुढ लेखनशैली व अफाट प्रतिभाशक्तीचे सामर्थ्य दिसून येते.

त्यांनी दिलेली विविध नाटकं, काव्यसंग्रह अद्यापही चिरतरुण आहेत. म्हणूनच कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

३) विंदा करंदीकर (२००३):

लेखक, कवी तसेच समीक्षक गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांना सन २००३ मध्ये त्यांच्या अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. वि. स. खांडेकर व कुसुमाग्रज यानंतर मराठी भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे विंदा करंदीकर हे तिसरे साहित्यीक होते.

अष्टदर्शने या पुस्तकाद्वारे करंदीकरांनी सात पाश्चात्त्य व एक भारतीय अशा आठ तत्त्वज्ञांच्या विचारांची मराठी वाचकांना ओळख करून दिली. करंदीकरांच्या एकूण साहित्यकृतीमध्ये विविध काव्यसंग्रह, बालकवितासंग्रह, ललित निबंध, समीक्षा यांचा समावेश आहे.

४) भालचंद्र नेमाडे (२०१४):

उत्तम कवी, कादंबरीकार तसेच समीक्षक म्हणून प्रख्यात असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच भालचंद्र वनाजी नेमाडे यांना सन २०१४ मध्ये हिंदू या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ’ या नेमाडेंच्या पुस्तकातून त्यांच्यातील परखड लेखनशैली व स्पष्टवक्तेपणा दिसून येतो.

याव्यतिरिक्त नेमाडे यांनी दिलेल्या साहित्य कृतीमध्ये कोसला, बिढार, झूल, जरीला अशा कादंबऱ्या, देखणी, मेलडी असे काव्यसंग्रह, तुकाराम, टीकास्वयंवर, साहित्याची भाषा अशा विविध समीक्षा यांचा समावेश होतो.

अनेकदा विचारले जाणारे प्रश्न:

  1. मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?

    मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विष्णू सखाराम खांडेकर यांना त्यांच्या ययाती या कादंबरीसाठी मिळाला.

  2. आत्तापर्यंत मराठी भाषेसाठी किती ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत?

    आत्तापर्यंत मराठी भाषेसाठी एकूण ४ ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.

तर अशा प्रकारे आम्ही ‘ज्ञानपीठ पुरस्कार आणि विजेते मराठी साहित्यिक’ या लेखात ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल आणि गौरविलेल्या मराठी साहित्यिकांबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

नक्की वाचा:

Share on:

Leave a Comment