दिवाळी का साजरी केली जाते – दिवाळी सणाचे महत्व (२०२४)

दिवाळी (Diwali) हा आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक द्वितीया असा साधारण सहा दिवस साजरा केला जाणारा सण आहे. यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन, बलिप्रतिपदा (दीपावली पाडवा), भाऊबीज (यमद्वितीया) यांचा समावेश होतो. यातील प्रत्येक दिवस त्याच्याशी निगडित असणाऱ्या पौराणिक तसेच ऐतिहासिक घटनेची आठवण करून देत असतो.

त्यामुळे दिवाळीतील प्रत्येक दिवस का साजरा केला जातो याचेही कारण यासंबंधी असणाऱ्या आख्यायिकांवर अवलंबून आहे. चला तर मग दिवाळीतील प्रत्येक दिवसासंबंधित असणाऱ्या आख्यायिकांबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात.

Diwali information in Marathi

दिवाळी सणाची माहिती | Diwali information in Marathi

वसुबारस (Govatsa Dwadashi):

वसुबारस हा सण आश्विन वद्य द्वादशीला साजरा केला जातो. यादिवशी गाईची वासरासह पूजा केली जाते. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या पाच कामधेनूंपैकी मुख्यत्वे नंदा या कामधेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. तसेच हा दिवस साजरा करण्यामागे असणारी एक आख्यायिका पुढीलप्रमाणे आहे.

या आख्यायिकेनुसार एका वृद्ध स्त्रीकडे गाई, म्हशी तसेच गव्हाले व मुगाले नावाची दोन वासरे होती. एकदा आश्विन वद्य द्वादशी दिवशी ती वृद्ध स्त्री गाईंना रानात चरायला घेऊन गेली होती. जाताना तिने तिच्या सुनेला गहू व मूग काढायला सांगितले व गव्हाले व मुगाले शिजवून ठेव असे सांगितले. पण सुनेला सासूने दिलेल्या सूचना नीट कळाल्या नाहीत त्यामुळे तिने नकळतपणे गव्हाले व मुगाले नावाच्या दोनही वासरांना शिजवले.

सासू घरी आल्यनंतर तिला तिची चूक लक्षात आली व ती देवाजवळ तिच्याकडून नकळतपणे घडलेल्या अपराधाची क्षमा मागू लागली व वासरे पुन्हा जिवंत करण्यासाठी याचना करू लागली. व देवानेदेखील तिची विनंती मान्य करीत ती वासरे पुन्हा जिवंत केली.

धनत्रयोदशी (Dhanatrayodashi):

आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदिवशीची प्रचलित असणारी आख्यायिका म्हणजे याच दिवशी देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदावे रत्न म्हणजेच अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी बाहेर पडले होते. धन्वंतरी हे देवांचे वैद्य तसेच भगवान विष्णूंच्या २४ अवतारांपैकी एक आहेत.

तसेच यादिवशी यमदीपदान देखील केले जाते. यामागील आख्यायिका पुढीलप्रमाणे आहे.

एकेकाळी हेम नावाचा राजा होता. त्याच्या पुत्राच्या कुंडलीनुसार विवाहानंतर चौथ्या दिवशी त्याच्या पुत्राचा मृत्यू होणार होता. विवाहानंतर ज्या दिवशी त्याचा मृत्यू होणार होता त्या दिवशी रात्री त्याचे महाल असंख्य दिव्यांनी उजळवून प्रकाशमान केले गेले. त्यामुळे जेव्हा यमराज राजपुत्राचे प्राण हरण्यास आला तेव्हा त्याचे डोळे प्रकाशाने दिपून गेले व तो यमलोकात परतला. म्हणूनच याचदिवशी अपमृत्यू टळावा यासाठी संद्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याचे टोक दक्षिणेकडे ठेवले जाते.

नरकचतुर्दशी (Narak Chaturdashi):

आश्विन वद्य चतुर्दशी म्हणजेच नरकचतुर्दशीची सर्वश्रुत असणारी आख्यायिका म्हणजे नरकासुर वधाची.

पृथ्वीचा म्हणजेच भूमीचा पुत्र भौमासुर यालाच नरकासुर असेही संबोधले जाते, हा अत्यंत असुरी प्रवृत्तीचा होता. त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त करून घेतले होते. ज्यानुसार देव तसेच दानवांकडून त्याचा वध होणार नाही पण त्याची आई म्हणजे भूमाताच त्याच्या वधासाठी कारण ठरणार होती.

या वरदानामुळे तो देवांसाठी तसेच माणसांसाठी त्रासदायक ठरला होता. त्याने इतर दैत्यांच्या साहाय्याने इंद्रदेवावर विजय मिळवला होता तसेच देवमाता अदितीची कुंडले व वरुणदेवाचे छत्रदेखील हस्तगत केले होते. त्याने मणी पर्वत काबीज करून त्यावर प्राग्ज्योतिषपूर नावाची राजधानी स्थापन केली. येथेच त्याने अपहरण केलेल्या १६१०० स्त्रियांना बंदी करून ठेवले होते. नरकासुराच्या जाचाला कंटाळलेल्या देवांनी श्रीकृष्णाकडे साहाय्याची याचना केली.

त्यामुळे श्रीकृष्णाने भूमातेच्या अवतार असणाऱ्या देवी सत्यभामाच्या साहाय्याने प्राग्ज्योतिषपूर नगरीवर आक्रमण केले. व आश्विन वद्य द्वादशीला नरकासुराचा व इतर दैत्यांचा वध करून देवांना व माणसांना त्याचा जाचातून मुक्त केले होते. त्यामुळे श्रीकृष्णाने नरकासुरावर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून नरकचतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे यादिवशी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी नरकासुराचा प्रतीक मानले जाणारे चिरोटे (कारिट) डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडण्याचा प्रघात आहे.

लक्ष्मीपूजन (Laxmi pujan):

lakshmi pujan in marathi

आश्विन महिन्याच्या अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. अमावस्या असूनही हा दिवस शुभ मानला जातो यामागची आख्यायिका अशी कि याच दिवशी समुद्रमंथनावेळी देवी लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या तसेच यासंदर्भातील दुसरी आख्यायिका अशी कि आश्विन अमावास्येलाच भगवान विष्णूंनी बळीच्या कारावासात बंदी असणाऱ्या देवी लक्ष्मी व इतर देवतांना मुक्त केले होते.

बलिप्रतिपदा (Balipratipada):

कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा. यालाच दीपावली पाडवा असेही म्हणतात. बलिप्रतिपदा साजरा करण्यामागची आख्यायिका पुढीलप्रमाणे आहे.

भक्त प्रल्हादाचा नातू म्हणजेच बळीराजा हा प्रजाहितदक्ष तसेच अत्यंत दानशूर राजा होता. याचक दान म्हणून जे मागेल तो ते दानात देत असे. याचक दानासाठी पात्र आहे का हेदेखील तो पाहत नसे. बळीराजाच्या या स्वभावामुळे त्याचे राज्य व त्याचे सामर्थ्य खूप वाढले होते. इतके कि त्याने देवांनाही धोका निर्माण झाला होता. त्याने देवांवर आक्रमण करून स्वर्गावरसुद्धा ताबा मिळवला होता. त्यामुळे देवांवरील संकट निवारण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला.

बळीराजा यज्ञ समाप्त करून दान करीत असताना वामन अवतार धारण केलेले भगवान विष्णू बळीसमोर गेले व त्यांनी बळीला त्रिपाद भूमिदान करण्यास सांगितले. व बलीनेही ते मान्य केले. तेव्हा उंचीने लहान असणाऱ्या ब्राम्हण बटूने विराट रूप धारण केले. त्याने त्याच्या एका पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली व दुसऱ्या पावलात संपूर्ण अवकाश व्यापून टाकले.

त्यानंतर वामनाने तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारले असता बळीने तिसरे पाऊल आपल्या डोक्यावर ठेवण्यास सांगितले. तेव्हा वामन अवतारातील भगवान विष्णूंनी बळीच्या डोक्यावर पाय ठेवत त्याला पाताळात धाडले. बळीचे औदार्य पाहून प्रसन्न झालेल्या वामनाने बळीला पाताळलोकाचे राज्य देऊ केले व स्वतः बळीच्या दारी द्वारपाल म्हणून राहिले.

भाऊबीज /यमद्वितीया (Bhaubeej):

Bhaubeej festival in Marathi

भाऊबीज म्हणजेच यमद्वितीया हा सण कार्तिक शुक्ल द्वितीया यादिवशी साजरा केला जातो. भाऊबीज ह्या सणाला यमद्वितीया म्हणण्यामागची तसेच हा दिवस साजरा करण्यामागची आख्यायिका पुढीलप्रमाणे आहे.

ही आख्यायिका यमराज व यमुना (यमी) या भावाबहिणींच्या नात्यावर आधारित आहे. यम व यमी हि सूर्यदेवाची मुले आहेत. दोन्ही भावंडांना लहानपणापासूनच एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता. यमुनेचे लग्न झाल्यानंतर मात्र यमाचे व यमुनेचे भेटणे कमी झाले. याचे कारण असे कि यमराज हि मृत्यूची देवता आहे व आपल्यामुळे आपल्या बहिणीवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून तो तिला भेटणे टाळी.

पण यमीला मात्र तिच्या भावाचा विरह सहन झाला नाही. म्हणून तिने यमाला तिच्या घरी येण्याचा आग्रह केला. व यमालाही यमीच्या आग्रहास्तव तिच्या घरी जावे लागले. तो दिवस होता कार्तिक शुक्ल द्वितीयेचा. यम घरी आल्यानंतर यमीने त्याचे उत्तमरीत्या आदरातिथ्य केले, त्याला ओवाळले, जेऊ घातले. यमराजाने प्रसन्न होऊन यमीला वर मागायला सांगितला.

त्यावर यमीने दरवषी या दिवशी यमाने तिला भेटण्यासाठी तिच्या घरी यावे असे आश्वासन मागितले व तसेच यादिवशी जो भाऊ आपल्या बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी जाईल, तिच्याकडून ओवाळून घेईल त्याला तू यातना देऊ नको, असे सांगितले. यावर यमानेही तथास्तु म्हणत तिचा हा वर मान्य केला.

तेव्हापासूनच भाऊबीज या सणाला सुरुवात झाली तसेच या दिवशी यम त्याच्या बहिणीच्या घरी जेवायला जातो म्हणून या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाऊ लागले.

अशा प्रकारे दिवाळीतील प्रत्येक दिवस साजरा करण्यामागे काय कारणं आहेत व या दिवसाचे महत्व काय आहे हे आम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न:

  1. 202४ मध्ये दिवाळी कोणत्या तारखेला आहे?

    २०२४ मधील दिवाळी पुढील तारखांना आहे:
    वसुबारस: २८ ऑक्टोबर
    धनत्रयोदशी: २९ ऑक्टोबर
    नरकचतुर्दशी: ३१ ऑक्टोबर
    लक्ष्मीपूजन: १ नोव्हेंबर
    बालिप्रतिपदा: २ नोव्हेंबर
    भाऊबीज: ३ नोव्हेंबर

  2. दिवाळी सणामध्ये पहिली अंघोळ किती तारखेला आहे?

    २०२४ मध्ये दिवाळीची पहिली अंघोळ ३१ ऑक्टोबर रोजी (गुरुवार) आहे.

  3. धनत्रयोदशी कोणत्या दिवशी आहे?

    २०२४ मध्ये धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर रोजी (मंगळवार) आहे.

  4. दिवाळी सण किती दिवस आहे?

    दिवाळी सण हा साधारण सहा दिवसांचा असतो. ( वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज)

  5. भाऊबीज कोणत्या दिवशी आहे?

    २०२४ मध्ये भाऊबीज ३ नोव्हेंबर रोजी (रविवार) आहे.

  6. लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे?

    २०२४ मध्ये लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबर रोजी (शुक्रवार) आहे.

आम्ही लिहिलेला दिवाळीचा लेख वाचल्याबद्दल खूप धन्यवाद. आम्हाला आशा आहे कि दिवाळी बद्दलची ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. जर आवडली असेल तर हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि कंमेंट करून लेख कसा वाटलं हे कळवायला विसरू नका.

हे देखील वाचा:

References:

  1. धनतेरस की पौराणिक कथा by festivalsofindia
  2. कारिट नरकासूराचे प्रतिक by think maharashtra
  3. Satyabhama by wikipedia
  4. Narkasur vadh story by hindi.webdunia
  5. भाऊबीज (यमद्वितीया) by quora

Image credits:

  1. Bhai Dooj Vectors by Vecteezy
  2. Image by Harryarts on Freepik
Share on:

Leave a Comment