डिप्लोमा म्हणजे काय, संपूर्ण माहिती

दहावी तसेच बारावीनंतर करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध होतात व यातील अनेक विद्यार्थी डिप्लोमा कोर्सेस करण्यास आपली पसंती दर्शवतात. असं काय आहे डिप्लोमा कोर्सेसमध्ये जे अनेकांचे लक्ष वेधून घेतात तसेच यामध्ये कोणते कोणते विविध अभ्यासक्रम उपलब्ध असतात अशा अनेक बाबींबद्दलची चर्चा आपण या लेखात करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया डिप्लोमा म्हणजे नक्की असत तरी काय!

डिप्लोमा बद्दल माहिती

डिप्लोमा म्हणजे काय?

डिप्लोमा हे महाविद्यालय किंवा विद्यापीठाद्वारे प्रदान केले जाणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे जे विशिष्ट विषयातील अभ्यास पूर्ण झाल्याचे सूचित करते.

डिप्लोमा हा वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, शैक्षणिक, कला, बँकिंग, फायनान्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध आहे. हा कोर्स पूर्ण करणाऱ्यांना डिप्लोमा होल्डर (Diploma holder) असे संबोधले जाते. यासाठी लागणारा प्रशिक्षण कालावधी हा विषयानुसार साधारणपणे सहा महिने ते चार वर्ष या दरम्यान असतो.

उदाहरणार्थ, अभियांत्रिकीसाठी असणाऱ्या डिप्लोमा कोर्सेसचा कालावधी तीन ते चार वर्षे इतका असतो तर काही इतर क्षेत्रातील डिप्लोमा हा ६ ते २४ महिने इतक्या कालावधीसाठी असतो. डिप्लोमा कोर्सेसचा कल हा कमी कालावधीत औद्योगिक दृष्ट्या आवश्यक असणारे प्रशिक्षण देऊन विशिष्ट जॉबरोल साठी प्रशिक्षणार्थींना तयार करणे असा असतो. त्यामुळे डिप्लोमा धारकांना पदवीधारकांच्या तुलनेने लवकर नोकरीसाठी तयार होता येते.

काही डिप्लोमा कोर्सेसच्या अभ्यासक्रमामध्ये अप्रेंटिसशिप चा समावेश होतो यामध्ये प्रशिक्षणार्थींना विद्यालयातील प्रशिक्षणासह कामाचा प्रत्यक्ष अनुभवदेखील घेता येतो.

डिप्लोमा चे प्रकार:

किमान शैक्षणिक पात्रतेनुसार डिप्लोमा कोर्सेसचे खालील प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते:-

अ) दहावीनंतर (After SSC):

या प्रकारामध्ये असणाऱ्या कोर्सससाठी प्रवेश मिळवण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. यामध्ये विद्यार्थ्यांना संबंधित विषयातील औद्योगिक क्षेत्रामध्ये गरजेचे असणारे प्रशिक्षण दिले जाते व संबंधित जॉबरोल साठी तयार केले जाते. अनेक कॉलेजेस व विद्यापीठांमध्ये दहावीनंतर करता येण्याजोगे विविध क्षेत्रातील असंख्य डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. यातील काही कोर्सेस हे पुढील प्रमाणे आहेत.

१) इंजीनियरिंग डिप्लोमा: इंजिनीरिंगमधील केल्या जाणाऱ्या डिप्लोमांना पॉलिटेक्निक कोर्सेस असेही म्हणतात. या कोर्सेससाठी लागणाऱ्या कालावधी हा तीन ते चार वर्षे इतका असतो. या प्रकारामध्ये मोडणाऱ्या काही विषयांची यादी पुढीलप्रमाणे आहे:- मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल, पेट्रोकेमिकल, ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन, आयटी, इत्यादी.

यामध्ये संबंधित विषयातील औद्योगिक दृष्ट्या गरजेचे असलेले प्राथमिक प्रशिक्षण देऊन कमी कालावधीत प्रशिक्षणार्थींना तयार केले जाते. या कोर्सेस साठी लागणारा कालावधी हा संबंधित विषयातील डिग्री कोर्सेसपेक्षा कमी असतो तसेच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रतासुद्धा कमी असते.

येथे वाचा: डिग्री (Degree) कोर्से बद्दल संपूर्ण माहिती.

२) इंटरियर डिझाईन: डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन या कोर्ससाठी असणारा कालावधी हा दोन किंवा तीन वर्ष इतका असतो.

३) संगणक व माहिती तंत्रज्ञान: या प्रकारामध्ये असणारे काही कोर्सेस पुढील प्रमाणे आहेत:
डिप्लोमा इन थ्रीडी ॲनिमेशन, सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इत्यादी.

४) मॅनेजमेंट: दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टेनोग्राफी व सेक्रेटरीअल प्रॅक्टिस यामध्ये डिप्लोमा करता येतो व या कोर्ससाठी लागणारा कालावधी हा दोन वर्षे इतका असतो.

५) सौंदर्य संस्कृती: सौंदर्य क्षेत्रामध्ये इच्छुक असणाऱ्यांना ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग या विषयांमध्ये डिप्लोमा करता येतो तसेच याचा कालावधी साधारणतः दोन वर्षे इतका असतो.

६) फॅशन टेक्नॉलॉजी: डिप्लोमाच्या या प्रकारामध्ये पुढील काही कोर्सेसचा समावेश होतो:-
डिप्लोमा इन ड्रेस डिझाईनिंग
फॅशन अँड टेक्स्टाईल डिझाईनिंग डिप्लोमा
या कोर्सेस साठी लागणारा कालावधी हा साधारणतः दोन ते तीन वर्षे इतका असतो.

ब) बारावीनंतर (After HSC):

बारावीसाठी निवडलेल्या शाखेनुसार म्हणजेच विज्ञान, कला, वाणिज्य यानुसार विविध डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश घेता येतो. यामध्ये असणारे काही कोर्सेस पुढील प्रमाणे आहेत:-

१) वैद्यकीय: यामध्ये समाविष्ट होणारे काही कोर्सेस पुढील प्रमाणे आहेत:- डिप्लोमा इन डेंटल टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन होमोडायलिसिस टेक्निशियन, डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, इत्यादी.
या कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी एच.एस.सी. विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

२) इंजीनियरिंग: बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर काही इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेसमध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळवता येतो. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार डिप्लोमासाठीचा विषय निवडता येतो.

३) टुरिझम अँड हॉटेल: केटरिंग व हॉटेल मॅनेजमेंट सारख्या विषयांमध्ये इच्छुक असणाऱ्यांना डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन तसेच डिप्लोमा इन मरीटाईम केटरिंग अशा विषयांमध्ये डिप्लोमा मिळवता येतो.

४) डिजिटल फोटोग्राफी: बारावी तसेच इतर समतुल्य अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झाल्यानंतर डिजिटल फोटोग्राफी अँड डिजिटल ग्राफिक्स या विषयांमध्ये डिप्लोमा करता येतो. या कोर्ससाठीचा साधारण कालावधी हा दोन वर्षे इतका असतो.

५) फ्रुट प्रोसेसिंग अँड वाईन टेक्नॉलॉजी: एच.एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड वाईन टेक्नॉलॉजी हा दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे.

६) कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग: एच.एस.सी. (विज्ञान, वाणिज्य, कला, एम.सी.वी.सी.) उत्तीर्ण झालेल्यांना कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग मध्ये डिप्लोमा करता येतो.

क) डिप्लोमा किंवा पदवी नंतर:

डिप्लोमा किंवा पदवीनंतर करता येणाऱ्या काही डिप्लोमा कोर्सेसना एडिशनल डिप्लोमा किंवा पोस्ट डिप्लोमा असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ-
ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायबर सेक्युरिटी मॅनेजमेंट
ॲडव्हान्स डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टीम
पोस्ट डिप्लोमा इन CAD/CAM
ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी अँड मॅनेजमेंट
असे अनेक शाखांसाठी विविध ऍडिशनल डिप्लोमा किंवा पोस्ट डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत.

डिप्लोमा चे फायदे:

डिप्लोमा कोर्सेस करण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत:-

१) डिप्लोमा साठी लागणारा खर्च हा संबंधित डिग्री कोर्सच्या खर्चापेक्षा कमी असतो.
२) काही डिप्लोमा कोर्सेससाठी निवड करताना अतिरिक्त प्रवेश परीक्षा घेतली जात नाही.
३) यासाठी लागणारी पात्रता किमान साधारणतः एस.एस.सी. किंवा एच.एस.सी. अशी असते.
४) हा कोर्स कमी कालावधीत पूर्ण होतो.
५) डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर संबंधित विषयांमध्ये डिग्री पदविका घ्यायची असल्यास डिग्री अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेता येतो.

डिप्लोमा आणि पदवीतील फरक:

डिप्लोमा व पदवीमध्ये असणारे काही फरक पुढीलप्रमाणे आहेत:-

१) डिप्लोमा मध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी किमान शैक्षणिक पात्रता पदवीसाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेच्या तुलनेने कमी असते.
२) पदवीमध्ये डिप्लोमाच्या तुलनेने अधिक सखोल ज्ञान दिले जाते.
३) डिप्लोमा कोर्सेस हे दहावी नंतर सुद्धा करता येतात तर डिग्री कोर्सेससाठी साधारणता एच.एस.सी. उत्तीर्ण असणे गरजेचे असते.
४) डिप्लोमा पदवी पेक्षा कमी कालावधीत पूर्ण होतो.
५) डिप्लोमा साठी होणारा खर्च पदवीपेक्षा कमी असतो.

डिप्लोमा कोर्स फीस:

डिप्लोमासाठी असणारी फी हि निवडलेल्याअभ्यासक्रमानुसार वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, इंजिनीअरिंगमध्ये असणाऱ्या डिप्लोमासाठी असणारी कोर्से फी हि सर्वाधिक असते तर काही डिप्लोमा हे अत्यंत कमी खर्चातदेखील करता येतात.

अनेकदा विचारले जाणारे प्रश्न:

  1. डिप्लोमा अभ्यासक्रम महत्त्वाचे का आहेत?

    डिप्लोमा कोर्सेसचे प्रशिक्षण हे डिग्री कोर्सेसपेक्षा कमी कालावधीत व लवकर पूर्ण करता येते, ज्यामुळे नोकरीसाठी लवकर तयार होता येते.

  2. डिप्लोमा केल्यानंतर काय होते?

    डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करता येऊ शकते किंवा त्यानंतर संबंधित विषयातील डिग्रीसाठी प्रवेश घेता येतो.

  3. मी डिप्लोमा नंतर पदवी घेऊ शकतो का?

    डिप्लोमा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही डिप्लोमासाठी घेतलेल्या विषयानुसार तुम्हाला पदवी कोर्सेससाठी प्रवेश घेता येतो.

हे देखील वाचा:

Share on:

Leave a Comment