अष्टविनायक गणपती

Ashtavinayak Ganpati information in Marathi वाचकहो, या लेखात आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या पुणे, रायगड व अहमदनगर या ठिकाणी स्थित असलेल्या तसेच अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या आठ स्वयंभू स्थानांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यात मंदिराची संरचना, बाप्पाच्या मूर्तीचे वैशिष्ट्ये तसेच तिथल्या आख्यायिका समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

Ashtavinayak Ganpati information in marathi
Ashtavinayak-Ganpati-information-in-marathi

अष्टविनायक गणपतीची माहिती मराठीत Ashtavinayak Ganpati information in marathi

अष्टविनायक Ashtvinayak:-

गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते.

अशा या बाप्पाचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजेच अष्टविनायकाची महाराष्ट्रातील आठ मंदिरं.
महाराष्ट्रातील रायगड, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री ओझर व रांजणगाव या ठिकाणी आठ पवित्र व स्वयंभू गणपतीची विविध रूपे आहेत.

प्रत्येक मंदिराला त्याचे-त्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. प्रत्येक मंदिरातील मूर्तीचे स्वरूप हे विलोभनीय आहे तसेच तिथल्या मंदीरातील ऐतिहासिक बांधकाम व कलाकुसर उल्लेखनीय आहे.

भक्तांमध्ये अष्टविनायक यात्रेचे विशेष महत्त्व आहे या यात्रेची सुरुवात मोरगावचा मोरेश्वरापासून सुरू होऊन पुन्हा इथे येऊन या यात्रेचा शेवट केला जातो. तर अष्टविनायक प्रत्येक स्थानाचे महत्त्व, तिथली आख्यायिका व मंदिर याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

१. मोरगावचा मयुरेश्वर:-

पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असणारे हे बाप्पाचे मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर आहे.

पुणे जिल्ह्यातील हे गाव बारामती तालुक्यामध्ये स्थित आहे. व पुणे शहरापासून हे 55 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्वी या गावात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचे म्हणून याला मोरगाव असे नाव पडले.

मयुरेश्वर (मोरेश्वर):-

मोरेश्वर किंवा मयुरेश्वर हे गणपतीची स्वयंभू मुर्ती पुर्वाभिमुख असून सोंड डावीकडे वळलेली आहे.

बाप्पाच्या या लोभस व आकर्षक मुर्तीच्या डोळ्यांमध्ये व नाभीमध्ये हिरे जडविलेले आहेत तसेच मूर्तीवर नागाच्या फण्याचे सुंदर छत्र आहे. इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत तसेच पुढे उंदीर व मोर उभे आहेत.

अष्टविनायक यात्रेला सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते व असे सांगितले जाते की या यात्रेचा शेवटही जर येथे झाला तर ही यात्रा खऱ्या अर्थाने सफल होते.

मंदिर:-

मोरगावातील कऱ्हा नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिर संरक्षक भिंतीनी वेढलेले आहे. सध्याच्या या मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोळे यांनी पूर्ण केले.

मंदिरांवर मोघल सैन्याने आक्रमण करू नये म्हणून या मंदिराचे बांधकाम वरकरणी मुस्लिम मशीदी सारखे करण्यात आले. या मंदिरासमोर नंदीची एक भव्य मूर्ती व मोठ्या आकाराचा दगडी उंदीर आहे. गणपती समोर नंदी असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे.

आख्यायिका:-

गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी आणि राणी उग्रा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवाने अमरत्वाचे वरदान दिले होते. त्याने अहंकार व असुरी वृत्तीने देवांवर आक्रमण करवून आणले. त्यामुळे सिंधूसुराचा नाशिक करण्यासाठी देवांनी विघ्नहर्त्या गणपती कडे प्रार्थना दिली तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मोरेश्वर अवताराने सिंधूसुराचा वध केला व देवांना व पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त केले.

२. सिद्धटेकचा सिद्धिविनायक:-

सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे हे मंदिर म्हणजे अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती. अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे.

सिद्धिविनायक:-

उत्तराभिमुख असलेली अष्टविनायकांपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जीची सोंड उजवीकडे आहे. उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो तसेच त्याचे सोवळेही कडक असते. तसेच या गणपतीला प्रसन्न करणेही कठीण समजले जाते.
बाप्पाची ही मूर्ती तीन फूट उंच आहे व त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी व सिद्धी विराजमान आहेत.

भक्तांमध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला एकवीस दिवस 21 प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्त्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्णत्वास जाते.

मंदिर:-

सध्या अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला गाभाऱ्यात असलेल्या सिद्धिविनायकाच्या मखर पितळी आहे तसेच त्यावर चंद्र सूर्य तसेच गरूडची कलाकृती साकारली आहे.

आख्यायिका:-

भगवान विष्णू ध्याननिद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैटभ दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणीत होते.

त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांची ध्याननिद्रा भंग करून मधु व कैटभ यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाही व त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवले त्यावर भगवान शंकरांनी मधु व कैटभाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली.

त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीशी मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली व येथेच गणपतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या व त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु व कैटभाचा पराभव केला.

३. पालीचा बल्लाळेश्वर:-

रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो.

बल्लाळेश्वर:-

पूर्वाभिमुख श्रीगणेशाची हि मूर्ती अरुंद असून तिचे कपाळ मोठे आहे. तसेच सोंड डाव्या दिशेला वळलेली आहे आणि मूर्तीच्या डोळ्यात व नाभीत हिरे जडविलेले आहेत. या मूर्तीच्या मागच्या बाजूला चंदेरी महिरप आहे व त्यावर रिद्धी-सिद्धी यांची कलाकृती साकारली आहे.

मंदिर:-

सध्या पाली येथे स्थित असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. व तिथल्या लाकडी मंदिराचे रुपांतर दगडी मंदिरात केले. या ठिकाणी सूर्याच्या दक्षिणायनाच्या काळात म्हणजेच हिवाळ्याच्या काळात सूर्याची किरणे बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात.

आख्यायिका:-

त्रेता युगामध्ये कल्याण नावाचा वाणी त्याच्या पत्नीसमवेत या गावी राहत होता. कालांतराने त्यांना बल्लाळ नावाचा पुत्र झाला. बल्लाळ हा लहानपणापासूनच निस्सीम गणेशभक्त होता. त्याची व त्याच्या मित्रांची गणेशावर अपार श्रद्धा होती. हे सर्व जण गणेश भक्तीमध्ये तल्लीन होऊन तहान भूकही विसरून जात असत.

ते जंगलामध्ये एका धोंड्याला गणपती स्वरूप मानून पूजा करीत असत.‌ त्यामुळे एके दिवशी बल्लाळ हा आपल्या मुलांना बिघडवत आहे अशी तक्रार घेऊन गावकरी कल्याण वाण्याकडे गेले होते. व त्यामुळे संतप्त झालेला कल्याण रागाने बल्लाळला शोधण्यासाठी जंगलात निघून गेला. तिथे गेल्यावर त्याने तिथली पूजा उधळून लावली तसेच गणपती म्हणून पुजलेला धोंडाही फेकून दिला.

तिथली बाकीची मुले पळून गेली पण बल्लाळ मात्र नामस्मरणात व्यस्त होता. पण चिडलेल्या कल्याणने कोणताही विचार न करता बल्लाळला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले व तिथल्याच एका झाडाला बल्लाळला बांधून तो तिथून निघून गेला. तेव्हा बल्लाळने मनाशी ठरवले की जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत गणेशाचा जप चालू ठेवायचा.

बल्लाळ ची निस्सीम भक्ती पाहून गणपती ब्राह्मणाचा अवतार घेऊन त्याच्याजवळ आला. गणपतीने स्पर्श करताच बल्लाळच्या शरीरावरील सर्व जखमा नाहीशा झाल्या व त्याचे शरीर पुन्हा आधी सारखे झाले प्रसन्न झालेल्या गणेशाने बल्लाळला वर मागण्यास सांगितले.

तेव्हा बल्लाळाने इच्छा व्यक्त केली की गणपतीने इथेच राहून भक्तांची इच्छा पूर्ण कराव्यात. तेव्हा गणपतीने बल्लाळला वचन दिले कि, “माझा एक अंश इथे कायम वास्तव्य करेल व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेल तसेच इथले माझे हे स्थान बल्लाळविनायक म्हणून ओळखले जाईल”.
असे म्हणून गणपती जवळच्या एका शिळेत अंतर्धान पावला.

४. महडचा वरदविनायक:-

रायगड जिल्ह्यातील महड येथील वरदविनायकाचे मंदिर हे अष्टविनायक यात्रेतील चौथे स्थान आहे. भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा व नवसाला पावणारा अशी या बाप्पाची ख्याती आहे.

वरदविनायक:-

इसवी सन १६९० साली धोंडू पौढकर या गणेश भक्ताला स्वप्नांमध्ये देवळाच्या मागे स्थित असलेल्या तळ्यामध्ये ही मूर्ती असल्याचे कळले.

त्यानंतर त्याने तळ्यामध्ये या मूर्तीचा शोध घेऊन त्या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे व मूर्तीजवळ एक अखंड दिवा तेवत ठेवलेला आहे. हा दिवा इ.स. १८९२ पासून अखंड तेवत ठेवलेला आहे.

मंदिर:-

इ.स. १७२५ मध्ये सुभेदार रामजी भिवलकर यांनी हे मंदिर उभे केले. हे मंदिर कौलारू आहे व मंदिराच्या घुमटाला सोनेरी कळस आहे. तसेच या देवळाच्या चारही दिशांना हत्तीची प्रतिकृती साकारली आहे.

आख्यायिका:-

राजा भीम व त्याच्या पत्नीला श्री गणेशाच्या कृपेने रुक्मंद नावाच्या पुत्र प्राप्त झाला. राजा रुक्मंद एकदा अरण्यात शिकारीसाठी गेला असताना ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात विश्रामासाठी गेला होता. तेव्हा ऋषी वाचक्नवींची पत्नी मुकुंदा राजाच्या प्रेमात पडली. परंतु राजाने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही व तो तिथून निघून गेला.

इंद्रदेवाला ही गोष्ट कळल्यावर तो रूक्मंदाचे रूप घेऊन मुकुंदाकडे गेला व इंद्रदेवांपासून मुकुंदाला ग्रित्सम्द नावाचा पुत्र प्राप्त झाला. ग्रित्सम्दाला त्याच्या जन्माबद्दल सत्य समजल्यानंतर त्याने आईला शाप दिला व स्वतः पापक्षालन करण्यासाठी जंगलात निघून गेला.

तेथे त्याने श्री गणेशाची प्रार्थना करत घोर तपसाधना केली. त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन त्याला वर दिला व ग्रित्सम्दाने गणपतीला तेथेच राहून भक्तांचे विघ्न दूर करण्याची विनंती केली.

५. थेऊरचा चिंतामणी:-

अष्टविनायक यात्रेतील पाचव्या स्थानावर असलेले बाप्पांचे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील थेऊर या गावी वसलेले आहे. भक्तांच्या चिंता दूर करणाऱ्या या गणपतीच्या रूपाला चिंतामणी असे म्हणतात.

चिंतामणी:-

थेऊरचा या मंदिरातील बाप्पाची मूर्ती पूर्वाभिमुख असून ही मूर्तीसुद्धा डाव्या सोंडेची आहे. तसेच या गणपतीचे डोळे रत्नजडित आहेत. थोर संत मोरया गोसावी यांनी तपसाधना करून या ठिकाणी सिद्धी प्राप्त केली.

मंदिर:-

सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे पेशवे काळात बांधले गेले. हे मंदिर लाकडापासून उभारले गेले आहे तसेच मंदिरात पितळेची मोठी घंटा आहे.

आख्यायिका:-

गणासुर या असुराने कपिला ऋषींकडे असलेले चिंतामणी हे रत्न चोरले होते. ते रत्न परत मिळवण्यासाठी दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची आराधना करून त्यांची मदत मागण्यास सांगितले.

यामुळे गणपतीने गणासुराचा वध करून ते रत्न मिळवले व कपिला ऋषींना परत केले. पण कपिला ऋषीने ते चिंतामणी रत्न गणपतीच्या गळ्यात घातले. तेव्हापासून इथल्या गणपतीला चिंतामणी हे नाव प्राप्त झाले.

६. लेण्याद्रीचा गिरिजात्मज:-

शिवनेरी नजीकच्या लेण्याद्रीच्या कुशीत वसलेले गिरीजात्मजाचे मंदिर म्हणजे अष्टविनायकातील गणपतीचे सहावे स्थान आहे. देवी पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी येथेच तपसाधना केली होती म्हणूनच पार्वतीचा म्हणजेच गिरीजेचा पुत्र गिरीजात्मज म्हणून इथल्या गणपतीला ओळखले जाऊ लागले.

गिरीजात्मज:-

उत्तराभिमुख असलेल्या बाप्पाच्या या मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली आहे. तसेच कपाळावर व नाभीत हिरे जडविलेले आहेत. तसेच या मूर्तीच्या उजव्या बाजूला महादेवाची व डाव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे.

मंदिर:-

अष्टविनायकांपैकी पर्वतावर असणारे हे एकमेव मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री या डोंगरावर एकूण अठरा गुहा आहेत त्यातील आठव्या गुहेत गिरिजात्मजाची मूर्ती आहे तसेच मंदिरातील खांबांवर वाघ, सिंह, हत्ती यांची कलाकृती कोरलेली आहे.

आख्यायिका:-

गणेश आपला पुत्र म्हणून जन्माला यावा यासाठी देवी पार्वतीने याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली व त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी देवीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून गणेशाची मूर्ती बनवली व त्या मूर्तीतून श्रीगणेशाची निर्मिती केली.

७. ओझरचा विघ्नेश्वर:-

जुन्नर या तालुक्यातील ओझर हे अष्टविनायकातील सातव्या गणपतीचे ठिकाण. विघ्नासूराचा नाश करण्यासाठी गणपतीने विघ्नेश्वराचा अवतार घेतला होता.

विघ्नेश्वर:-

पूर्वाभिमुख असलेल्या या गणपतीची सोंड डावीकडे आहे तसेच डोळ्यांमध्ये माणिक व कपाळी हिरे जडविलेले आहेत. तर दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत.

इंद्र देवाने निर्माण केलेल्या विघ्नासूराचा नाश करण्यासाठी श्री गणेशाने हे अवतार घेतले होते. तसेच अष्टविनायकातील हा गणपती सर्वात श्रीमंत समजला जातो.

मंदिर:-

सध्या अस्तित्वात असलेले हे मंदिर चिमाजी आप्पा यांनी इ.स. १७८५ च्या काळात बांधले या देवळाला चारही बाजूंनी सुरक्षित तटबंदी आहे व मंदिराच्या मुख्य दरवाजावर चार द्वारपाल उभे आहेत तसेच मंदिराचा कळस व शिखर सोनेरी आहे व मंदिराच्या पुढे मोठे सभागृह आहे.

आख्यायिका:-

राजा अभिनंदन याच्या इंद्रस्थान प्राप्तीच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी देवेंद्राने विघ्नासूराला पाचारण केले. त्यामुळे विघ्नासुराने तेथील यज्ञात विघ्न आणायला सुरुवात केली. तसेच पृथ्वीवर विध्वंस करायलाही सुरुवात केली त्यामुळे त्रस्त झालेल्या ऋषींनी ब्रह्मदेव व भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे श्री गणेशाकडे प्रार्थना केली. तेव्हा श्री गणेशाने विघ्नासुराने बरोबर युद्ध करून त्याचा पराभव केला. शरण आलेल्या विघ्नासुराने आपले नाव श्री गणेशाच्या नावाबरोबर घेतले जावे अशी इच्छा व्यक्त केली तेव्हापासून या गणपतीला विघ्नहर असे म्हटले जाऊ लागले.

८. रांजणगावचा महागणपती:-

पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील रांजणगाव या गावात महागणपतीचे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रेतील हे गणपतीचे आठवे ठिकाण आहे. तसेच हा अष्टविनायकापैकी सर्वात शक्तिशाली गणपती आहे.

महागणपती:-

डाव्या सोंडेची बापाची ही लोभस मूर्ती कमळावर आसनस्थ आहे. तसेच दोन्ही बाजूस रिद्धी व सिद्धी उभ्या आहेत त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकर यांनी या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती. तसेच भक्तांमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून महागणपतीची ख्याती आहे तसेच इथे असा समज आहे की या गणपतीची मूळ मूर्ती ही तिथल्या तळघरात असून तिला महाउत्कट असे संबोधले जाते.

मंदिर:-

पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचा गाभारा माधवराव पेशवे यांनी बांधला या मंदिराची संरचना अशी केली आहे की सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायनाच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीवर पडतात. रांजणगावच्या मंदिरातले भव्य सभामंडप सरदार किबे यांनी बांधले होते.

आख्यायिका:-

त्रिपुरासुर हा असुर गणपतीच्या निस्सिम भक्त होता. त्याने गणपतीला प्रसन्न करून त्याच्याकडून वरदान प्राप्त करून घेतले होते की भगवान शंकराशिवाय त्याचा विनाश कोणीही करू शकणार नाही.

त्यानंतर त्याने देवांना तसेच पृथ्वीतलावरील ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या व घाबरलेल्या देवांना नारद मुनींनी गणपतीची आराधना करून मदत मागण्यास सांगितले. त्यामुळे देवांची मदत करण्यासाठी गणपतीने ब्राह्मणाचा वेश धारण केला व त्रिपुरासुराकडे जाऊन आपण चौसष्ट कलांमध्ये पारंगत असल्याचे सांगितले व जर त्रिपुरासुराने जर कैलासावरील चिंतामणीची मूर्ती आपणास आणून दिली तर त्याला तीन विमान बनवून देऊ असे आमिष दिले.

त्यामुळे उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले आणि त्रिपुरासुर व भगवान शंकर यांच्यातील युद्धाला सुरुवात झाली. युद्धात त्रिपुरासुराला पराजित करणे शक्य होत नसल्याने भगवान शंकर यांनी रांजणगाव येथे गणेशाची प्रार्थना केली त्यानंतर श्रीगणेशाच्या सूचनेप्रमाणे भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment